एकल विद्यालय - शिक्षणाची प्रकाशवाट
अमेरिकेत न्यूजर्सीमधील एडनच्या एका हॉलमध्ये जमलेले रसिक लता मंगेशकर, आशा भोसले, नूरजहॉं आणि गीता दत्त यांनी अजरामर करून ठेवलेल्या गाण्यांचा आनंद घेताना जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले होते. सा रे ग म प या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना भेटलेली संजीवनी भेलांडे आपल्या सहकाऱयांच्या साथीने आपल्या सूरेल आवाजाने जुन्या गाण्यांची जादू पसरवत होती आणि हॉलमधील रसिक अक्षरक्षः भारावून गेले होते.
कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि रसिकांच्या आग्रहाखातर वेळ संपल्यानंतरही कार्यक्रमाची वेळ तब्बल तासभर वाढवण्यात आली. या कार्यक्रमामुळे रसिकांना मिळालेल्या आनंदाला समाधानाची आणि कृतज्ञतेचीही झालर होती. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणाऱया निधीतून त्यांच्या मायदेशातील हजारो मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश पसरणार आहे याची जाणीव त्यांना होती.
न्यू जर्सीच्या एकल विद्यालय फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून थोडाथोडका नाही तर तब्बल पावणेदोन कोटी डॉलरचा निधी उभा राहिला. न्यू जर्सीतील चेरीहिल आणि महावा येथे त्याच आठवड्यात झालेल्या संजीवनी भेलांडेच्या कार्यक्रमातून उभा राहिलेला एकूण निधी होता सव्वातीन लाख डॉलर! दिवसाला एक डॉलर म्हणजे दरवर्षी केवळ ३६५ डॉलर असा उपक्रम राबवून हा निधी जमा केला जातो.
एकल विद्यालय फाऊंडेशन ही भारतीय तसेच अनिवायीस भारतीयांनी स्थापन केलेली स्वयंसेवी संस्था. तिच्या माध्यमातून सर्वात मोठी साक्षरता मोहिम राबवली जाते. आपल्या कामात पारदर्शकता आणि उत्तम प्रशासकीय व्यवस्था ठेवल्याबद्दल या संस्थेला २००८-०९ या वर्षासाठी सर्वोत्कृष्ठ स्वयंसेवी संस्था म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.
संस्थेने निधी उभारण्यासाठी या वर्षी संजीवनी भेलांडे आणि त्यांच्या सहकाऱयांचे साठ दिवसाच्या कालावधीत तीन कार्यक्रम आयोजित केले आहेत. येत्या अॉगस्ट महिन्यात संजीवनी परत एकदा अमेरिकेत असेल.
भारतातील मुख्य जीवन प्रवाहापासून दूर राहिलेल्या, वनवासी भागात तसेच हिमालयाच्या कुशीत वसलेल्या जम्मू -काश्मीर आणि हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांसह देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या हजारो लहान मुलांना शिक्षण देण्यासाठी सत्तावीस हजारांपेक्षा जास्त एकल विद्यालय चालवण्यात येतात. एकल म्हणजे एक शिक्षकी शाळा. जात, धर्म, वंश याचा कोणताही विचार न करता सर्वच लहानग्यांना या शाळांमध्ये अनौपचारिक शिक्षणाबरोबरच स्वच्छतेचेही धडे दिले जातात. या २७ हजार एकल विद्यालयांपैकी आठ हजारपेक्षा जास्त एकल विद्यालयांना एकल विद्यालय फाऊंडेशन, यूएसए या संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यात येते.
अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुखासमाधानाचे जीवन जगत असताना आपल्या मायदेशातील त्यातूनही दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आपण काहीतरी करावे असे एकल विद्यालय फाऊंडेशनच्या सदस्यांना का वाटावे. त्याचे उत्तर न्यू जर्सीतील संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञा क्षिती नेमक्या शब्दात देतात. भारतात शिक्षणासाठी फार मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने आम्ही शिक्षण घेऊ शकलो. आमच्याशी कोणताही परिचय नसलेल्या व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यामुळे ते शक्य झाले. त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून भारतातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फूल ना फूलाची पाकळी अशा स्वरूपात हा निधी जमा केला जातो.
एकल विद्यालय फाऊंडेशन या संस्थेचे काम प्रकाश वाघमारे आणि त्यांची पत्नी नीला यांनी न्यू जर्सीत सुरू केले. स्वतः प्रकाश वाघमारे मात्र भारतात नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या एकल विद्यालयाच्या प्रकल्पाशी जोडले गेलेले आहेत.
एकल विद्यालय फाउंडेशन अमेरिकेत दरवर्षी संगीताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्या द्वारे सुमारे ३० लाख डॉलरचा निधी जमा करते. त्याचे साधेसोपे सूत्र आहे दरदिवशी एक डॉलर. केवळ जमा करून संस्था थांबत नाही तर त्यांनी दिलेल्या निधीचा उपयोग कशा प्रकारे होतो हे प्रत्यक्ष बघण्यासाठी भारतात चालणाऱया एकल विद्यालयांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी प्रोत्साहन देते.
मूल जर शाळेत येत नसेल तर शिक्षण त्याच्यापर्यंत घेऊन जा हा स्वामी विवेकानंदांचा संदेश प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न संस्था या कामाच्या माध्यमातून करत आहे.
एकल विद्यालय फाउंडेशनच्या कामाबाबत अधिक माहिती www.ekalvidya.org या बेवसाईटवर मिळू शकेल.
सौजन्य: सकाळ वृत्त सेवा
http://www.esakal.com/esakal/20100605/5630817937210726191.htm
![]()







